बारामती | निरोगी आई – आनंदी मुलगी’ थीमवर, मु सा काकडे महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबिर.

पुरंदर रिपोर्टर–Live 

सोमेश्वरनगर | प्रतिनिधी  

                                 मु. सा. काकडे महाविद्यालय, सोमेश्वरनगर येथे जागतिक महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, महिला सबलीकरण समिती, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, प्राथमिक आरोग्य केंद्र होळ व ग्रामपंचायत वाघळवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘निरोगी आई – आनंदी मुलगी’ या विशेष थीमवर हा उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्या सविता काकडे व प्राथमिक आरोग्य केंद्र होळचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. ज्ञानदीप राजगे यांच्या हस्ते झाले. यावेळी तिरुपती बालाजी ऍग्रो प्रोडक्ट प्रा. लि.च्या संचालिका आशालता शिंदे, हेमंत गायकवाड यांची विशेष उपस्थिती होती.

                 उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉ. ज्ञानदीप राजगे म्हणाले की, “महिलांच्या हक्कासाठी झालेल्या लढ्याच्या स्मरणार्थ ८ मार्च हा दिवस जगभरात महिला समानता, सन्मान व सशक्तीकरणाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. स्त्री ही समाजाची प्रेरणादायी शक्ती असून तिच्या आरोग्याची काळजी घेणे ही समाजाची जबाबदारी आहे.”

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, “महिला दिन हा केवळ महिलांचा सन्मान करण्याचा दिवस नसून त्यांना सुरक्षित, प्रगत आणि निरोगी वातावरण देण्याचा संकल्प करण्याचाही दिवस आहे. विद्यार्थिनी आणि त्यांच्या मातांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी महाविद्यालयाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र होळ यांच्या सहकार्याने खर्चिक वैद्यकीय तपासण्या मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहेत.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व समन्वय डॉ. जया कदम यांनी केले. कार्यक्रम दोन सत्रात पार पडला. दुसऱ्या सत्रात विद्यार्थिनी व त्यांच्या मातांसह एकूण २११ जणांची विविध वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागामार्फत १२० विद्यार्थिनींची रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. गरजेनुसार अनेकांना औषधांचे वाटपही करण्यात आले.

या शिबिरासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र होळ येथील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. डॉ. ज्ञानदीप राजगे यांनी महिलांना आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले तसेच त्यांच्या आरोग्यविषयक प्रश्नांचे निरसन केले.

यावेळी व्यवस्थापन समिती सदस्य प्रा. सुजाता भोईटे, उपप्राचार्य डॉ. जगन्नाथ साळवे, महिला सबलीकरण समितीच्या सदस्या प्रा. शिल्पा कांबळे, प्रा. वनिता कांबळे, प्रा. अर्चना पवार, डॉ. कल्याणी जगताप, प्रा. निलम देवकाते, प्रा. चेतना तावरे, प्रा. मृणालिनी मोहिते, डॉ. आदिनाथ लोंढे, डॉ. गेणू दरेकर, डॉ. नारायण राजूरवार, प्रा. नीलिमा निगडे, प्रा. मेघा जगताप, डॉ. दत्तात्रय डुबल, प्रा. रजनीकांत गायकवाड तसेच महिला प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अच्युत शिंदे यांनी केले. या उपक्रमासाठी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीशराव काकडे, प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अभिजित काकडे, सचिव सतीश लकडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments